नवी दिल्ली - भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (BJP Sambit Patra) यांनी रविवारी एका कार्यक्रमात अजब दावा केला आहे. मोदी सरकाराने गावागावात शौचालय ही योजना राबवल्याने अनेक राज्यांमध्ये बलात्कारांच्या घटना कमी झाल्या आहेत असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील भाजपा कार्यालयात एका कार्यक्रमाला संबोधित करताना संबित पात्रा मोदी सरकारची आठ वर्ष याअंतर्गंत मोदी सरकारने केलेल्या योजनांबाबत माहिती देत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुलींच्या शाळेला भेट दिली तेव्हा तेथील महिला व विद्यार्थिनींसोबत चर्चा केली. याच दरम्यान, त्यांना लक्षात आलं की मुलांच्या तुलनेत मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण शाळेत शौचालय नाही आहेत असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. महिला रात्रीच्या अंधारात शौचास जातात तेव्हाच बलात्काराच्या घटना अधिक घडतात. अनेक राज्यात बलात्कारांच्या घटनांमध्ये घट झाली आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिलांना 'इज्जतघर' (शौचालय) मिळवून दिलं आहे.
पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना शौचालयाबाबत बोलतील असा विचारही कोणी कधी केला नसेल. नरेंद्र मोदी देशातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी शौचालयासारख्या विषयावर भाषण केलं. आजच्या घडीला देशातील सहा लाखांहून अधिक गावांत शौचालय बांधण्यात आलं आहे.
संबित मात्रा यांनी यावेळी काँग्रेस आणि आपवरही जोरदार निशाणा साधला आहे. पंजाबमध्ये आप सत्तेत आल्यानंतर 15 दिवसांतच केजरीवाल यांना भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांला हटवावे लागले. तर, एकीकडे मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात एकाही केंद्रीय व कॅबिनेट मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.