चंदिगड - चंदिगड बलात्कार प्रकरणी भाजपा खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. किरण खेर यांनी पीडित तरुणीला सल्ला देताना, ऑटोरिक्षात आधीपासूनच तीनजण बसले असताना पाहिल्यावर तिने रिक्षात बसायला नको होतं असं म्हटलं आहे. किरण खेर यांच्या वक्तव्याचा निषेध होत असून, टीका केली जात आहे. दुसरीकडे किरण खेर यांनी स्पष्टीकरण देत, याप्रकरणी राजकारण केलं जाऊ नये अशी विनंती केली आहे. 'मी फक्त इतकंच म्हटलं होतं की, समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मुलींनी काळजी घेणं गरजेचं आहे असं मला म्हणायचं होतं', असं किरण खेर यांनी सांगितलं आहे.
मोहालीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहणा-या 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. 17 नोव्हेंबरच्या रात्री एका रिक्षाचालकाने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी या घटनेवर बोलताना किरण खेर यांनी वक्तव्य केलं की, 'मी सर्व मुलींना सांगू इच्छिते की, जर आधीपासूनच रिक्षामध्ये तीन पुरुष बसले असतील तर तुम्ही त्यात बसलं नाही पाहिजे. मुलींच्या सुरक्षेसाठी मी हे सांगत आहे. जेव्हा आम्ही बाहेर जायचो तेव्हा आम्हाला आमच्या घरचे सोडायला यायचे. आम्ही त्यांनी रिक्षा किंवा टॅक्सीचा नंबर लिहून देत असे. आजच्या काळातही तितकंच सतर्क राहण्याची गरज आहे'.
किरण खेर यांच्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षालाही टीका करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन कुमार बन्सल यांनी वक्तव्याचा निषेध करताना सांगितलं आहे की, अशाप्रकरणी असं बेजबाबदार वक्तव्य केल्याचं मला आश्चर्य वाटत आहे. या वक्तव्यावरुन तरी किरण खेर हे प्रकरण फार गांभीर्याने घेत नसल्याचं दिसत आहे. चंदिगडमधील तरुणींच्या सुरक्षेसाठी काय पाऊलं उचलली जाऊ शकतात यावर त्यांनी चर्चा करणं अपेक्षित होतं'.
वाद वाढू लागल्यानंतर किरण खेर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'मी फक्त एवढंच म्हटलं होतं की, सध्या परिस्थिती खराब आहे, मुलींनी काळजी घेतली पाहिजे. जर कोणी 100 क्रमांक लावला तर चंदिगड पोलीस पीसीआर पाठवतात. राजकारण करण्याची गरज नाही. जे राजकारण करतायत त्यांना लाज वाटली पाहिजे. तुमच्या घरातही मुली आहेत', असं किरण खेर बोलल्या आहेत.
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com