नवी दिल्ली - हैदराबाद बलात्कारातील आरोपींचा एन्काऊंटर असो वा उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीला जाळण्याचा प्रकार असो, देशभरात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना याबाबत लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.
लोकसभेत महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जाणार आहेत तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचं काम होतंय. उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जाळण्यात आलं. त्यात ९५ टक्के पीडित युवती भाजली. देशात चाललंय तरी काय? उन्नावच्या घटनेत सरकार आणि पोलीस अपयशी ठरलेत असा आरोप त्यांनी केला.
तर अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला. त्यांनी महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणं चुकीचं आहे. यापूर्वी मी असं कधी पाहिले नाही. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरलं जातं. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असं त्यांनी सांगितले.
दरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महिला सुरक्षेसाठी कडक कायद्याची गरज असून अशाप्रकारचे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी यावेत. सध्याच्या न्याय प्रक्रियेमध्ये कनिष्ठ न्यायालयापासून हे सुरु होतं. अनेक खटले वर्षोनुवर्ष सुरुच राहतात. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभा अध्यक्षांनी समिती गठित करुन चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्याचसोबतच एक आई, मुलगी आणि पत्नी म्हणून तेलंगणा पोलिसांनी बलात्कार गुन्ह्यातील आरोपींवर जी एन्काऊंटर कारवाई केली त्याचे स्वागत करते. निर्भयासोबत जे घडतं. तिचं नाव निर्भया नव्हतं ते नाव लोकांनी दिलं होतं. पण मला वाटतं की, पीडितेला नाव देण्यापेक्षा आरोपींना अंतिम शिक्षा द्यावी अशी मागणी अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांनी केली आहे.