नवी दिल्ली - चीनच्या सीमेवरील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय दलाने केलेली खास विनंती मान्य करून फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीत 5 विमानांची पाठवणी केली आहे. बहुप्रतिक्षीत असलेल्या या राफेल विमानांचं भारताच्या अंबाला विमानतळावर आगमन झालं असन भारतीयांकडून वेलकम टू इंडिया म्हणत राफेलचं स्वागत करण्यात येत आहे. राफेलचं भारतात आगमन होताच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. राजनाथसिंह यांनी ट्विटरवरुन राफेलच्या लँडिंगची माहितीही दिली.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राफेल विमानांच्या गगनभरारीचा अफलातून व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, काही वेळातचं राफेल विमानाचं अंबाला विमानतळावर आगमन झालंय. त्यानंतर, राजनाथसिंह यांनी आनंद व्यक्त करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धाडसी निर्णयक्षमतेचं कौतुक केलं. राफेल या लढाऊ विमानाची खरेदी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे शक्य झाली. गेल्या कित्येक वर्षांपासून केवळ कागदी प्रस्तावात अडकलेल्या राफेल विमानांचा, फ्रान्स सरकारसोबत करार करताना, पंतप्रधानांनी तत्परता दाखवली. मोदींच्या या धाडसाबद्दल आणि निर्णयक्षमेतबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे राजनाथसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
तसेच, भारतीय हवाई दलाचेही राजनाथसिंह यांनी अभिनंदन केले असून मला राफेलच्या आगमनाचा अत्यानंद झाल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी म्हटलंय. तर फ्रान्स सरकारने कोविड19 च्या महामारीच्या संकटातही राफेल विमानांची पाठवणी केली, त्याबद्दल फ्रान्स सरकारचेही संरक्षणमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान, भारतात अंबाला विमानतळावर राफेल विमानं दाखल झाली असून सोशल मीडियावरीही राफेलचीच हवा दिसून येत आहे. फ्रान्सकडून पहिल्या टप्प्यात 5 राफेल विमानं भारताला देण्यात आली असून या 5 राफेलसह 2 SU30 MKIs विमान आहेत. तत्पूर्वी, भारतीय आकाशात राफेलचं आगमन झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे.
राफेल विमानांमुळे भारताच्या हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष म्हणजे भारतात येणाऱ्या राफेल लढाऊ विमानांकडे मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला एअरफोर्स स्टेशनवर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. राफेलसारख्या प्राणघातक आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांना तैनात करण्यासाठी केवळ अंबालाच का निवडले गेले. कारण अंबाला अशी जागा आहे जिथून आपल्या देशातील दोन्ही शत्रूंना काही मिनिटांत धुळीस मिळवता येऊ शकते.