राफेल : नव्या खुलाशाची नोंद घ्या, काँग्रेसची कॅगकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 07:24 AM2018-10-05T07:24:20+5:302018-10-05T07:25:23+5:30
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून मोदी सरकारवर हल्ल्याची काँग्रेसची आक्रमकता कायम आहे.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्यावरून मोदी सरकारवर हल्ल्याची काँग्रेसची आक्रमकता कायम आहे. गुरुवारी काँग्रेसने कॉम्प्ट्रोलर अॅण्ड आॅडिटर जनरल (सीएजी) यांच्याकडे दाद मागितली व कॅगने खोलात जाऊन या संपूर्ण विमान खरेदीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करावे, अशी मागणी केली.
पक्षाचे नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसोबत सीएजी राजीव महर्षी यांना सात पानी निवेदन देऊन खरेदीशी संबंधित आठ मुद्यांवरील कागदोपत्री पुरावे देऊन काँग्रेस ज्यांच्या चौकशीची मागणी करीत आहे, ते प्रश्न उपस्थित केले. महर्षी यांना भेटल्यानंतर शर्मा म्हणाले की, राफेल विमान खरेदीवरून गेल्या काही दिवसांत नवे खुलासे झाले आहेत व त्यामुळे पूर्ण व्यवहार नव्या दिशेकडे जाऊन देशातील हा आतापर्यंतचा संरक्षण साहित्याबाबतचा सगळ्यात मोठा घोटाळा आहे याचे संकेत दिले.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ‘कॅग’कडे धाव
मोदी सरकार पुन्हा पुन्हा दावा करीत आहे की, आॅफसेट कराराचे प्रकरण डसॉल्ट आणि अंबानी यांच्या कंपनीतील होते. सरकारशी त्याचा काही संबंध नाही. आता हा दावा पूर्णपणे चुकीचा सिद्ध झाला आहे. डसॉल्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने व्यवहाराच्या १७ दिवस आधीच हा नवा करार केला होता, असे आनंद शर्मा म्हणाले.