नवी दिल्ली : आपल्या वजनाबद्दल लोक आता बरेच जागरूक होऊ लागले आहेत. त्यातून मग वजन कमी करण्याकडे बहुतेकांचा कल आहे. परंतु जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने वजन कमी करण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) लोकांना दिला आहे. तसेच लठ्ठपणाविरोधी औषधे न घेण्याचे आवाहनही केले आहे.
ओटीपोटाचा लठ्ठपणा, जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देताना आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम व हालचाल करण्याचा सल्लाही देण्यात आला.
आशियाई मानकानुसार २३ ते २७.५ किलोपर्यंतचा बीएमआय असल्यास वजन जास्त म्हणून धरले जाते. बीएमआय म्हणजे व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन भागिले व्यक्तीची मीटरमध्ये उंची. त्यानुसार भारतात ३० टक्के शहरी आणि १६ टक्के ग्रामीण प्रौढांचे वजन जास्त आहे.
१००० किलो कॅलरीपेक्षा कमी नको...वजन हळूहळू कमी करायला हवे. या काळातील आहार १००० किलोकॅलरी प्रतिदिनपेक्षा कमी नसावा आणि सर्व पोषकतत्त्वे पुरवणारा हवा. दर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
वजन कमी करण्यासाठी हे करा...- पुरेशा भाज्यांसह संतुलित जेवण : उच्च फायबर व पोषकतत्त्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा व अतिरिक्त कॅलरीजची गरज कमी करेल.- आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा : कमी कॅलरी आणि जास्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असलेल्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करतील.- स्नॅक स्मार्ट : मूठभर काजू, साधे दही, मसाल्यासह कापलेल्या भाज्या यांसारखे पोषक-पर्याय निवडा.- निरोगी स्वयंपाक पद्धती : ग्रीलिंग, बेकिंग, वाफाळणे किंवा भाजण्यासाठी तळण्याच्या तुलनेत कमी तेल लागते. यामुळे जेवणातील ऊर्जा घनता कमी होते.