हैदराबाद - डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अतिशय निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होत आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. संपूर्ण देशभरातून सोशल मीडियावर या खळबळजनक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. या घटनेनंतर राज्यसभेत खासदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर भाष्य करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात ठार करा असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे. तसेच हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणावर सरकारने ठोस उत्तर द्यावं असंही म्हटलं. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 'अनेक कायदे तयार केले आहेत. मात्र अनेकदा कायदे तयार करून समस्या सोडवल्या जात नाहीत. ही समस्या मूळापासून नष्ट करण्यासाठी सर्व समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे' असं देखील गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.
आपच्या संजय सिंह यांनी तरुणीच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळावा असं म्हटलं आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज असल्याचं देखील म्हटलं आहे. बलात्कार प्रकरणांवर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी. तसेच लवकरात लवकर आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी तरतूद करण्यात यावी असं देखील म्हटलं आहे. हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तरुणीला जाळून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. सायबराबाद पोलिसांनी तपासानुसार मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून आरोपी पसार झाले होते. मात्र मृतदेह जळाला हे पाहण्यासाठी ते घटनास्थळी परत आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
बलात्कार आणि हत्या प्रकरणाची वेगाने चौकशी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जलदगती न्यायालय (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करण्याची व तिच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची घोषणा केली. बलात्कार व हत्या प्रकरण हे फारच भयंकर असून, मला तीव्र वेदना झाल्याचे राव यांनी म्हटले. त्या घटनेनंतर राव प्रथमच जाहीरपणे बोलले असून, अधिकाऱ्यांना त्यांनी जलदगती न्यायालयाच्या स्थापनेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
पीडिता शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशू चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितेची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडिता स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कूटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले, तेव्हा पीडितेला काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितेनं फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री 9.15 वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची 6 वाजता दूधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी आले असतं त्यांना पीडितेचा स्कार्फ आणि चप्पल दिसली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.