वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या दुर्मिळ आंब्याला देणार ‘भारत’ नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:00 PM2020-08-19T13:00:19+5:302020-08-19T13:02:08+5:30
स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असलेले हे झाड संपूर्ण केरळात एकमेवाद्वितीय आहे. या जातीचे झाड अन्यत्र कोठेही नाही.
थ्रिसूर : वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या आंब्याचा शोध केरळातीलआंबाप्रेमींनी लावला असून, या आंब्याचे 'भारत आंबा' असे नामकरण करण्यात येणार आहे. एका 'फेसबुक कम्युनिटी'च्या सदस्यांना केरळातील थ्रिसूरपासून जवळ असलेल्या मुंदूर येथे रस्त्याच्या कडेला हे झाड आढळून आले. त्याचे जतन व्हावे, तसेच प्रसार व्हावा, यासाठी कम्युनिटी सदस्यांनी पुढाकार घेतला. आता या आंब्याचे रीतसर 'भारत आंबा' असे नामकरण करण्यात येणार आहे.
स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, हा आंबा शोधणारी 'फेसबुक कम्युनिटी' केवळ आंब्यावरच काम करते. कम्युनिटी सदस्य आठवड्यातून एकदा आंब्यांच्या दुर्मिळ आणि गुणवंत झाडांच्या शोधात बाहेर पडतात. अशाच एका दौऱ्यात त्यांना 'भारत आंबा' सापडला. हे झाड दर चार महिन्यांनी फुलते. हे कळाल्यानंतर कम्युनिटी सदस्यांनी पुढील सर्व बहर व्यापाऱ्याला सांगून आधीच बुक
करून घेतला. या आंब्याच्या कोयी गोळा करून केरळातील विविध ठिकाणी लावण्याची त्यांची योजना आहे.
या 'फेसबुक कम्युनिटी'मध्ये २0 हजार सदस्य असून, जिल्हापातळीवर त्यांचे व्हॉटस्अॅप ग्रुपही आहेत. दरवर्षी देशी आंब्याची ५0 हजार रोपे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. शाळांना दरवर्षी १४ हजार आंबा रोपेही ते वितरित करतात.
डॉ. रेजी जॉर्ज हे या कम्युनिटीचे एक सदस्य आहेत. थ्रिसूर येथील ज्युबिली मिशन हॉस्पिटलमध्ये रेडिओ डायग्नोसिस विभागात ते काम करतात. त्यांनी आपल्या घराच्या छतावर २ हजार आंबा रोपे तयार केली आहेत. ही रोपे ते लोकांना वितरित करतात.
कम्युनिटी सदस्यांनी सांगितले की, नव्याने शोध लागलेला आंबा चवीला प्रियूर आणि मुवांदन या स्थानिक प्रजातीच्या आंब्यांच्या एकत्रित चवीसारखा लागतो. त्याचे फळ साधारणत: ३00 ग्रॅम वजनाचे आहे.
................................................................
दुर्मिळ आंबा नष्ट होण्यापासून वाचवला
केरळातील पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील देशी आंब्याचे एक अत्यंत दुर्मिळ झाड ‘नादन मवुकल’ या आंबाप्रेमी समूहाने वाचविले आहे. पोनस असे या आंब्याचे नाव असून केरळी भाषेत पोनसचा अर्थ होतो ‘प्रिय’. स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असलेले हे झाड संपूर्ण केरळात एकमेवाद्वितीय आहे. या जातीचे झाड अन्यत्र कोठेही नाही. त्याचा ज्ञात इतिहास ४० वर्षांचा आहे. सजन एस यांच्या घराच्या आवारात हे झाड आहे.