Rashid Alvi: "देशभरातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घाला", काँग्रेस नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 10:08 AM2022-04-19T10:08:40+5:302022-04-19T10:12:41+5:30
Rashid Alvi: ''गेल्या आठ वर्षांपासून देशात विविध धर्मीयांमध्ये भांडणे सुरू आहेत, याला भाजप जबाबदार आहेत."
नवी दिल्ली: सध्या भारतात लाऊडस्पीकरवरुन (Loudspeaker) सुरू असलेल्या गदारोळात काँग्रेस नेते रशीद अल्वी (Rashid Alvi) यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. अल्वी यांनी देशभरात लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रशीद अल्वी म्हणाले की, ''जर लाऊडस्पीकर हे भांडणाचे-हिंसाचाराचे कारण असेल, तर देशभरातील लाऊडस्पीकर बंद करावेत."
''गेल्या आठ वर्षांपासून देशात विविध धर्मीयांमध्ये भांडणे सुरू आहेत. जर लाऊडस्पीकर या भांडणांचे कारण असेल, तर लाऊडस्पीकरवर बंदी घातली पाहिजे. देशात कुठेच विकास होताना दिसत नाही, विकासाचा नारा फक्त उच्चारला जातो. प्रत्यक्षात कुठेच विकास दिसत नाही. या देशात सध्या द्वेषाचे वादळ आहे, त्याला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा जबाबदार आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.
"धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घाला"
राशिद अल्वी यांनी यापूर्वीही दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, "देशातील वातावरण अत्यंत वाईट अवस्थेत आहे. देशात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व सरकारच्या माध्यमातून घडत आहे. प्रशासनाला हवे असते तर असे झाले नसते. लाऊडस्पीकर हे भांडणाचे मूळ असेल, तर सर्वच धार्मिक स्थळांमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घातली पाहिजे," असे ते म्हणाले.