Rashtrapatni Remark: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. चौधरी यांच्या 'राष्ट्रीयपत्नी' या शब्दावरुन जोरदार वाद सुरू आहे. दरम्यान, त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून म्हटले की, 'मी लिहून देतोय की, माझ्याकडून चुकीने तो शब्द निघाला. माझी जीभ घसरली, त्याबद्दल मी माफी मागतो आणि तुम्ही माफी स्वीकारावी ही विनंती."
संसदेत काँग्रेसच्या निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला होता. त्यावरुन सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद झाला. त्यांच्या विधानावरुन संसदेतही मोठा गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. भाजपकडून सातत्याने चौधरी यांच्या माफीची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी माफी मागितली आहे.
संसदेत गदारोळअधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी निदर्शानादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रपतींचा 'राष्ट्रीयपत्नी' असा उल्लेख केला होता. त्यांच्या तोंडून ‘चुकून’ शब्द निघाल्याचे चौधरी यांनी स्पष्टीकरण दिले. पण, भाजपने काँग्रेस नेत्याने राष्ट्रपतींचा अपमान असल्याचे म्हटले. यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशाची आणि राष्ट्रपतींची माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.
यावरून काल संसदेत जोरदार वाद झाला. सोनिया गांधी यांनी त्यांच्या नेत्यांना धमकावल्याचा आरोप भाजपने केला. हे दावे फेटाळून लावताना काँग्रेसने सोनिया गांधींना घेराव घालून त्यांचा अपमान केल्याचा आरोप केला. अधीर रंजन चौधरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केल्याचे सोनिया गांधी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. दरम्यान, आता चौधरी यांचा माफीनामा आल्यामुळे वाद मिटण्याची अपेक्षा आहे.