हैदराबाद (तेलंगणा) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिलेला आहे आणि जोपर्यंत समाजात भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी संघाचे समर्थन आहे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी व्यक्त केले.
एका व्हायरल व्हिडीओत कथितपणे कोटा पद्धत व आरक्षणाच्या विरोधात संघ असल्याचे दाखवले गेले त्यानंतर हैदराबाद येथील विद्या भारती विज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भागवत यांनी संघाचा आरक्षणाला विरोध असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले. कथित व्हिडीओमध्ये भागवतांना बैठक घेताना दाखविले गेले. याबाबत ते म्हणाले की, अशी बैठक कधीही झालेली नाही. सध्या तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने जे घडले नाही, तेही दाखवता येते. आरएसएस संविधानानुसार आरक्षणाला पाठिंबा देते. समाजात भेदभाव अस्तित्वात आहे, तोपर्यंत आरक्षण दिले जाते, समर्थन आहे.
सोशल मीडियाचा चांगला वापर व्हावा
nसोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी प्रसारित केल्या जातात. ती सोशल मीडियाची गुणवत्ता नसून ती वापरणाऱ्या संबंधित व्यक्तीची गुणवत्ता असते.
काही लोकांचा अशा प्रकारच्या बनावट गोष्टी पसरवणे आणि वाद निर्माण करणे हा स्वार्थ आहे; परंतु आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. निवडणुकीच्या वातावरणात असे प्रकार घडत असतात. शिक्षणाबरोबरच सोशल मीडियाचा लोककल्याणासाठी वापर करायलाही शिकवले पाहिजे, असे भागवत म्हणाले.
राहुल गांधी म्हणतात की भाजपला ४०० जागा मिळाल्यास, ते आरक्षण हटवतील. परंतु भाजप कधीही एससी, एसटी वा ओबीसींचे आरक्षण रद्द करणार नाही तसेच इतर कुणालाही करू देणार नाही.
- अमित शाह, गृहमंत्री