नवी दिल्ली - बिहारमध्येदारूबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दारू पिणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण दारूचे व्यसन असणारी मंडळी कसाही जुगाड करून दारूपर्यंत पोहोचतातच. बिहारमध्ये छापेमारीच्या सत्रात बहुतांश वेळेस दारू जप्त केली जाते. येथे अवैधरित्या विक्री करण्यात येणारी दारू गोदामामध्ये ठेवली जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भभुआ शहरातही अवैधरित्या दारूची विक्री केल्या जाणाऱ्या गोदामावर उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला. मात्र या कारवाईमध्ये जवळपास 200 बिअरच्या मोठ्या कॅनमधून सर्व बिअर अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले.
दारूबंदीच्या पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहेत. अवैधरित्या साठा करुन ठेवलेल्या दारुच्या गोदामावर छापा मारुन दारू नष्ट केली जात आहे. पण भभुआतील जरा विचित्रच प्रकरण समोर आले आहे. ज्या गोदामात बिअर ठेवली होती, ती नष्ट करण्यासाठी प्रशासनाचे एक पथक तेथे पोहोचले. मात्र बिअरचे सर्व कॅन त्यांना चक्क रिकामीच आढळले. तपास पथकानं चौकशी केल्यानंतर अजब-गजब उत्तरच त्यांना मिळालं. बिअरचे एवढे सर्व कॅन उंदरांनी रिकामे केली, असं भलतच उत्तर तपास पथकाला मिळालं.
भभुआ जिल्ह्याचे डीएम अनुपम कुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जप्त केलेली दारू नष्ट करण्यासाठी मोहीम चालवण्यात आली, तेव्हा हे प्रकरण समोर आले. प्रशासकीय पथक जेव्हा गोदामात दाखल झालं तेव्हा त्यांना सर्व कॅन्सना छिद्र पडलेली आढळली.जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षकांनुसार, 'कॅन्सना छिद्र पडल्यानं त्यातून बियरची गळती झाली. पण ही प्राथमिक माहिती असून अद्यापपर्यंत ठोस अशी माहिती समोर आलेली नाही'.
दरम्यान, गेल्या वर्षीही लाखो लिटर दारू गोदामांमधून गायब झाली होती, त्यावेळेसही उंदरांवरच दारू फस्त करण्याचा आरोप करण्यात आला होता.