दिल्लीमधील अतिक्रमण हटाओ मोहिमेंतर्गत पुन्हा एकदा बुलडोझर चालला असून, डीडीएने बुधवारी खजुरी खास परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई केली. त्यात अनेक अनधिकृत घरे पाडण्यात आली. डीडीएने या कारवाईत बेघर झालेल्यांमध्ये वकील हसन यांचाही समावेश आहे. या वकिल हसन यांना नोव्हेंबर महिन्यात उत्तरकाशीमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवल्या बद्दल सन्मानित करण्यात आले होते. वकील हसन हे पेशाने रॅट होल मायनर आहेत.
डीडीएने केलेल्या या कारवाईनंतर दु:खी झालेल्या वकील हसन यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ जणांना वाचवले, मात्र त्याच्या बदल्यात आम्हाला हे मिळाले. आधी मी अधिकारी आणि सरकारला विनंती केली होती की, हे घर आम्हाला दिलं जावं. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आज कुठलीही पूर्वसूचना न देता आमचं घर पाडलं गेलं.
तर या कारवाईबाबत डीडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अतिक्रमण विरोधी कारवाई ही ‘नियोजनबद्ध विकास भूमी’चा भाग असलेल्या जमिनीवर करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, या कारवाईमध्ये अवैध बांधकामे पाडण्यात आली. तसेच कारवाई करण्यात आलेल्या बांधकामांमध्ये राहणाऱ्या लोकांना पूर्वसूचना देऊनच ही बांधकामे पाडण्यात आली, असेही डीडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र रॅट मायनर वकील हसनच्या कुटुंबाने या कारवाईबाबत डीडीएकडून कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असा आरोप केला आहे.
वकील हसन म्हणाले की, लोकांना वाचवणे हे आमचं कर्तव्य होतं. त्यांना वाचवण्यासाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घातला. अशा प्रकारे अधिकारी माझ्या मुलांना बेघर करून माझ्याविरोधात बदला घेत आहेत. या कारवाईत माझी १५ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. मी डीडीएच्या पथकाकडे ही कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. मात्र कुणीही माझं ऐकलं नाही. या कारवाईत केवळ माझं घर हटवण्यात आलं, असाही आरोप त्यांनी केला.