नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला परवानगी दिल्यानंतर १ मार्च २०२१ पासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. यातच जागतिक पातळीवर प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. याबाबतची माहिती स्वतः रतन टाटांनी दिली आहे. (ratan tata got first dose of corona vaccination)
रतन टाटा यांनी कोरोना लस घेतल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. शनिवारी सकाळी केलेल्या एका ट्विटमध्ये रतन टाटा म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. त्याबाबत मी आभारी आहे. हे खूपच सोपे आहे आणि याचा बिलकूल त्रास झाला नाही. प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, असा विश्वास रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केला.
८३ वर्षीय रतन टाटा यांनी कोरोना लस घेतल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तींमधील कोरोना लसीसंदर्भातील भीती दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी कोरोना लसीबाबत संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींने कोरोना लस घेतल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास वाढेल, असे सांगितले जात आहे.
काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी अलीकडेच कोरोना लस घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत. कोरोना लस प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोला विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला होता.