मुंबई: टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची भेट घेणार आहेत. यावेळी टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन त्यांच्यासोबत असतील. या बैठकीत एअर इंडियाच्या बोलीसंदर्भात अंतिम चर्चा होणार आहे. एअर इंडियाच्या विक्रीसाठी अमित शाहंच्या नेतृत्त्वाखाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला. रतन टाटा या मंत्रिगटाची भेट घेणार असल्याचं वृत्त मनी कंट्रोलनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
अमित शाहंच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिगटाची भेट घेत असताना रतन टाटा, नटराजन चंद्रशेखरन यांच्यासह टाटा समूहाचे इतर प्रतिनिधीदेखील हजर असतील. यामध्ये टाटा सन्सच्या संरक्षण, एरोस्पेसचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल आणि मुख्य आर्थिक अधिकारी सौरभ अग्रवाल यांचा समावेश आहे. तर शाहंच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिगटात अर्थमंत्री निर्मला सीतारमन, वाणिज्यमंत्री पियूष गोयल, नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सहभाग असेल.
कर्जात बुडालेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सनी सर्वाधिक बोली लावली आहे. या खरेदीच्या कराराला अंतिम स्वरुप देण्याचं काम टाटा समूहाचे प्रतिनिधी आणि मंत्रिगटाच्या बैठकीत करण्यात येईल. एअर इंडियावर असलेल्या कर्जाची पुनर्रचना, कर्मचारी अधिग्रहण, भविष्यातील योजना या विषयांवर बैठकीत चर्चा होईल.