टाटा मीठापासून ते विमान सेवांपर्यंत वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात छाप सोडणारे प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. . इथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी उद्योग क्षेत्रातील रत्न हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते अगदी पंतप्रधान झाल्यानंतरचा रतन टाटा यांच्या सोबतच्या भेटींच्या आठवणीला उजाळा देत दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) रतन टाटा यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत उद्योग जगतातील समाजभान जपणाऱ्या रतन टाटा यांच्याबद्दलच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
श्री रतन टाटा जी एक दूरदृष्टी असणारे उद्योगपती, एक दयाळू व्यक्तीमत्व, आणि असमान्य व्यक्ती होती. त्यांनी भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्याला स्थिर नेतृत्व दिले. त्यांचे योगदान हे बोर्डरुम पलिकडचे होते. विनम्र स्वभाव, दयाळूपणा, आणि समाजाबद्दलची बांधिलकी यामुळेच त्यांनी अनेक लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्यासोबतच्या अनेक भेटी आजही आठवणीत आहेत.
मोठं स्वप्न पाहणं आणि दुसऱ्याबद्दल दायित्वाची भावना जपणं या दोन गोष्टी श्री रतन टाटा जी यांच्यातील सर्वात वेगळा आणि अनोखा पैलू होता. शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता, पशु कल्याण यासारख्या मुद्यांसंदर्भातील प्रश्नाच्या बाबतीत देखील ते नेहमी सर्वांत पुढे असायचे. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी नेहमी भेट व्हायची. वेगवेगळ्या मुद्यांवर विचारांची आदान प्रदान करायचो. त्यांचे विचार खूप उपयुक्त आणि अनमोल वाटतात. दिल्लीत आल्यानंतरही भेटी होत राहिल्या. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं खूप दु:ख झाले आहे. मी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांसोबतच्या दु:खात सहभागी आहे, ओम शांती. या शब्दांत पंतप्रधान मोदींनी टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे'