lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि मालदीवसोबतचा तणाव, यामुळे केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप चर्चेत आले आहे. दरवर्षी देशभरातील लाखो पर्यटक मालदीवला फिरायला जायचे, पण आता लक्षद्वीप पर्यटकांची पहिली पसंत बनत आहे. अनेकजण लक्षद्वीपला जाण्यास आणि तेथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यास उत्सुक आहेत. अशातच टाटा समूहाने लक्षद्वीपबाबत एक मोठी घोषणा केली आहे.
लक्षद्वीपमध्ये ताज हॉटेल सुरू होणारटाटा समूहाची उपकंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड(IHCL)ने लक्षद्वीपमध्ये दोन ताज-ब्रँडेड रिसॉर्ट्स उघडण्याची घोषणा केली आहे. हे प्रकल्प 2026 मध्ये पूर्ण होतील आणि पर्यटक इथे राहण्याचा आनंद लुटू शकतील. विशेष बाब म्हणजे, टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्येच लक्षद्वीपच्या सुहेली आणि कदमत बेटांवर ही हॉटेल्स सुरू करण्याची घोषणा केली होती.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपच्या बेटांचे फोटो शेअर करत पर्यटकांना इथे येण्याचे आवाहन केले होते. यामुळे सर्वांचे लक्ष अचानक लक्षद्वीपकडे वेधले गेले. सोशल मीडियावर अनेकांनी लक्षद्वीपला जाण्याचे आवाहन करत, बायकॉट मालदीवचा ट्रेंडही चालवला. अनेकांनी या बेटांची तुलना मालदीवशी केली आणि इथले समुद्रकिनारे मालदीवपेक्षा चांगले असल्याचे सांगितले. पण, अनेकांनी लक्षद्वीपमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी पुरेशी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स नसल्याचे म्हटले. पण, आता लवकरच इथे पायाभूत सुविधा वाढू शकतात.
हॉटेल्समध्ये सुविधा कशा असतील?कंपनीने सांगितले की, सुहेली येथील ताज बीचवर 60 व्हिला आणि 110 खोल्या असलेले 50 वॉटर व्हिला बांधले जाईल. तसेच, कदमत येथील 110 खोल्यांच्या ताज हॉटेलमध्ये 75 बीच व्हिला आणि 35 वॉटर व्हिला असतील. स्कूबा डायव्हिंग, विंडसर्फिंग, स्नॉर्कलिंग, सर्फिंग, वॉटर स्कीइंग यासह जलक्रीडांकरिता हे नंदनवन असल्याचे कंपनीने म्हटले आहे.