नवी दिल्ली, दि. 3 - आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसऱ्या विस्तारामध्ये 9 नवीन राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या 9 मंत्र्यापैकी एक राज्यमंत्री हे एकेकाळचे कडक आयएएस अधिकारी होते. त्यांनी अडवाणींच्या अयोध्या रथ यात्रेचा रथ रोखत अटकही केली होती. त्यांचं नाव आहे राजकुमार (आर.के.) सिंह. बिहारच्या आरा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी देशाचे गृहसचिवपद सांभाळले होते. विशेष म्हणजे समझोता आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांनी रा.स्व.संघाशी संबंधित आरोपींची नावे उघड केली होती.
64 वर्षांचे आर.के.सिंह 2013 साली केंद्रीय गृहसचिव पदावरून निवृत्त झाले. जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी रथ यात्रा सोमनाथहून निघाली होती. तेव्हा अडवाणींना बिहारमध्ये अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी दिले होते. तेव्हा समस्तीपूरचे जिल्हाधिकारी असलेल्या सिंह यांनी रथयात्रा रोखण्यात आणि अडवाणींना पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.
आर. के. सिंह यांनी नवी दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज तसेच नेदरलँडच्या आर. वी. बी. डेल्फ विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. सिंह हे मुळचे बिहारच्या सुपौल जिल्ह्याचे रहिवाशी आहेत. ते 1975च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयएएस आहेत. नोकरशाह असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा मसुदा तयार करण्याच्या कार्यातही त्यांचा समावेश होता. निवृत्त झाल्यानंतर सिंह राजकारणात सक्रीय झाले. 2014मध्ये भाजपच्या तिकीटावर ते निवडून आले.
आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. विस्तार आणि फेरबदलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी-शहा जोडगोळीच्या धक्कातंत्राचा प्रत्यय दिसून आला आहे. सत्यपाल सिंग यांचा अपवाद वगळता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ नव्या चेहरेही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवला. या पदासाठी निर्मला सितारामन यांनी निवड अनपेक्षित ठरली. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.
सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवाक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.