नवी दिल्ली - तुम्ही रेशनकार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून अंत्योदय रेशन कार्ड धारकांना खूशखबर दिली आहे. अंत्योदय कार्ड धारकांवर मोफत उपचारांसाठी आयुष्मान कार्ड तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी सरकारकडून जिल्हा आणि तालुका स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रांवर विशेष अभियान चालवण्यात येईल. या अभियानांतर्गत अंत्योदय कार्ड धारक सर्व कुटुंबांची आयुष्मान कार्ड तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
याशिवाय सरकारने जनसुविधा केंद्रांवर ही सुविधा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रेशन कार्ड दाखवून येथेही आयुष्मान कार्डसाठी अर्ज करता येऊ शकेल. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने सर्व अंत्योदय कार्ड धारकांसाठी आयुष्मान कार्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. हे अभियान जिल्हा स्तरावर २० जुलैपर्यंत चालवण्यात येईल.
आतापर्यंत सर्व अंत्योदय कार्डधारकांजवळ आयुष्मान कार्ड आलेले नाही, असे कार्डधारक २० जुलैपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण करू शकतात. पात्र लाभार्थी जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनलशी संबंधित खासगी रुग्णालये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये आपले अंत्योदय कार्ड दाखवून आपल्या कुटुंबाचं आयुष्मान कार्ड तयार करू शकता.
सध्या केंद्र सरकारकडून नवे आयुष्मान कार्ड तयार करण्यात आलेले नाही. ज्या लाभार्थ्यांचं नाव आधीपासून योजनेमध्ये आहे. केवळ त्यांनाच विभागाकडून कार्ड्स वितरित केली जातील. कुठल्याही अडचणीच्या वेळी अंत्योदय कार्ड धारकांना उपचारांसाठी रुग्णालयात भटकावे लागू नये शासन स्तरावर यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाना अंत्योदय रेशन कार्ड मिळते. या कार्डवर लाभार्थ्यांना दर महिन्याला माफक किमतीमध्ये जीवनावश्यक अन्नधान्य पुरवले जाते. कार्डधारकांना ३५ किलो ग्रॅम गहु आणि तांदुळ प्रतिकिलो २ आणि ३ रुपये दराने उपलब्ध करून दिला जातो.