भरतपूर – आजपर्यंत आपण ऐकलं असेल की पंतप्रधानांपासून अनेक मान्यवरांच्या नावानं बनावट रेशन कार्ड वितरित करण्यात आलं आहे, अलीकडेच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नावावर रेशनकार्ड काढण्यात आलं होतं, रेशन कार्ड ही अशी सुविधा आहे, ज्या गरिबांना अन्न सुरक्षा योजनेतून सरकारकडून दर महिन्याला घरगुती सामान मिळतं, परंतु राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे.
याठिकाणी कोणा व्यक्तीचं नव्हे तर चक्क देवाच्या नावानं रेशनकार्ड बनवण्यात आलं आहे, हनुमानाचं रेशन कार्ड बनवण्यात आलं आहे, इतकचं नाही तर दर महिन्याला हनुमान रेशन कार्डद्वारे केरोसिन तेलही घेताना दिसत आहे. सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी म्हणून हनुमान आणि मुरली मनोहर नावाने रेशन कार्ड बनवण्यात आलं आहे, जे दर महिन्याला केरोसिन तेल रेशन कार्डातून घेतात.
रेशनकार्डात लाभार्थीचं नाव म्हणून ढूंढारवाले हनुमान असं लिहिलं आहे, तर त्यांचे वय ८१ वर्ष दाखवण्यात आलं आहे, वडिलांचे नाव केसरी असा उल्लेख आहे, तर कुटुंबात अन्य ५ लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. या रेशनकार्डावर हनुमानाच्या नावासह त्यांचा फोटोही लावण्यात आला आहे, तर मुरली मनोहर यांचे वय १२१ वर्ष दाखवण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण रुदावल पंचायतीमधलं आहे, याठिकाणी हनुमान आणि मुरली मनोहर या नावाने रेशनकार्ड बनवण्यात आलं आहे.
या रेशनकार्डाच्या आधारे महिन्याला केरोसिन तेल स्वस्त दरात खरेदी केले जाते, हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभाग खडबडून जागं झालं आहे, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी सुभाष चंद गोयल म्हणाले की, रुपवास तहसिलच्या कार्यक्षेत्रात देवाच्या नावानं रेशनकार्ड बनवण्यात आलं आहे, ज्याची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकारे जिल्ह्यात अन्य काही घटना असतील का याचाही तपास आता होणार आहे. मात्र या प्रकारामुळे सध्या अन्न व नागरी पुरवठा विभाग चांगलंच चर्चेत आलं आहे.