मुंबई: तुम्ही रेशन कार्ड धारक असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सरकारनं काही अटींच्या अंतर्गत रेशन कार्ड जमा करण्याचा नियम तयार केला आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. सरकार तुमच्याकडून भरपाई घेऊ शकतं. यासोबतच कायदेशीर कारवाईदेखील केली जाऊ शकते.
कोरोना महामारीच्या दरम्यान लॉकडाऊन काळात सरकारनं गरिबांना मोफत रेशन देण्यास सुरुवात केली. गरिब कुटुंबांसाठी ही व्यवस्था आतापर्यंत लागू आहे. मात्र या योजनेसाठी पात्र नसणारे अनेक रेशन कार्ड मोफत धान्य घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे. यामुळे अनेक पात्र रेशन कार्ड धारकांना योजनेचा लाभ मिळत नाही.
अपात्र व्यक्तींनी तातडीनं रेशन कार्ड जमा करावं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अपात्र व्यक्तींनी रेशन कार्ड जमा न केल्यास तपासानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
नियम काय सांगतो? एखाद्याकडे १०० वर्ग मीटरपेक्षा अधिक आकाराचा प्लॉट, फ्लॅट किंवा घर, चार चाकी वाहन किंवा ट्रॅक्टर, गावात दोन लाख किंवा शहरात तीन लाखांहून अधिक कौटुंबिक उत्पन्न असल्यास त्यांनी तहसील आणि डीएसओ कार्यालयात रेशन कार्ड जमा करावं.
...तर भरपाई घेतली जाणारएखाद्यानं रेशन कार्ड जमा न केल्यास अशा व्यक्तीचं रेशन कार्ड रद्द करण्यात येईल. यासोबतच कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इतकंच नव्हे, तर ती व्यक्ती जेव्हापासून रेशन घेतेय, तेव्हापासूनची भरपाई घेतली जाईल.