देशात कोणीही रिकाम्या पोटाने झोपू नये, सर्वांना पोटभर अन्न मिळावे, या उद्देशाने सरकारकडून स्वस्त धान्य दुकानातून धान्य पुरवठा केला जातो. कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य दिलं आहे. स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना हा माल मोफत पुरविण्यात आला आहे. दरम्यान, सध्या एक मर्सिडीज कारमधून रेशनचं धान्य नेत असलेल्या युवकाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे, रेशनचा माल घरंच गरिबांपर्यंत पोहोचतो की काळ्या बाजारात विकला जातो, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गरिबांसाठी असलेलं रेशनचं धान्य घेण्यासाठी मर्सिडीज कारमधून व्यक्ती आल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे या कारचा नंबरही व्हीआयपी होता. त्यामुळे, तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ पंजाबमधील असून मर्सिडीज कारमध्ये आलेल्या व्यक्तीजवळ रेशनकार्ड असल्याचे दुकानदाराने म्हटले आहे. कारमधील या व्यक्तीने रेशन दुकानदाराकडे जाऊन तेथून ४ कट्टे माल उचलला आहे. कारच्या डिक्कीत तो माल टाकून तो कारसह तेथून निघून जात आहे. या व्यक्तीकडे रेशनचं कार्ड असल्याचं दुकानदाराचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मर्सिडीज सारख्या महागड्या कारमधून आलेल्या व्यक्तीने रेशनच्या दुकानातून कट्टे नेल्याने हा नक्कीच काळाबाजार असल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत. तर, दुकानदाराने रेशनकार्ड असल्यानेच आपण त्या व्यक्तीस धान्य दिल्याचं सांगितलं आहे.
ही माहिती आली समोर
मर्सिडीज कार चालविणाऱ्याचे नाव रमेश सैनी असून ते होशियारपूरचे रहिवाशी आहेत. परदेशात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांची ती कार असल्याचे सैनी यांनी सांगितले. तसेच, आमचं कुटुंब गरीब असून माझ्या घरी मुलगा, सून आणि दोन नातू आहेत. नातू सरकारी शाळेत शिकत आहेत. सैनी यांचा मुलगा फोटोग्राफर असून ते दुकानही भाड्याने आहे. व्हायरल व्हिडिओत हा काळा बाजाराचा माल असल्याचे काहीही तथ्य नसल्याचेही सैनी यांनी म्हटले.