लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेशनवरील तांदूळ, गहू आणि भरडधान्याचे भाव आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात दर तीन वर्षांनी रेशनवरील धान्याच्या भावाबाबत आढावा घेण्याची तरतूद आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २०१३मध्ये हा कायदा संमत केला होता. सध्या अत्यंत सवलतीच्या दरात १ ते ३ रुपये किलोप्रमाणे देशभरातील ८१ कोटींहून अधिक लोकांना रेशन दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. यामुळे वर्षाकाठी सरकारच्या तिजोरीवर १.४ लाख कोटी रुपयांचा बोजा पडतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात रेशनवरील अन्नधान्याचे दर आणखी एक वर्ष न वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला असल्याचे अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. या निर्णयातून सरकार गरीब आणि वंचित घटकांतील जनतेच्या भल्यासाठी बांधील असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी म्हटले आहे. देशभरातील ५ लाख रेशन दुकानांमार्फत (सार्वजनिक वितरण प्रणाली) प्रति व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. रेशनवरील तांदळाचा दर प्रति किलो ३ रुपये, गव्हाचा दर प्रति किलो २ आणि भरडधान्याचा दर प्रति किलो १ रुपया आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा नोव्हेंबर २०१६पासून देशभरात लागू करण्यात आला. यापुढे पाऊल टाकत सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत नोंदणीकृत घटकांंना म्हणजे शिधापत्रिकाधारकांच्या पोषण सुरक्षेवर सरकार लक्ष केंद्रित करणार आहे.
रेशनवरील धान्य स्वस्तच
By admin | Published: June 29, 2017 12:27 AM