चेन्नई - उंदरांनी कपडे कुरतडल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. मात्र तामिळनाडूमध्ये उंदरांनी नोटा कुरतडल्याची घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतमाल विकून आपल्या घरात ठेवलेल्या 50 हजार रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने धान्याची विक्री करून कष्टाने हे पैसे कमवले होते. शेतमाल विकून मिळालेले 50 हजार रुपये हे आपल्या झोपडीत जमा करून ठेवले होते. पैशांची गरज भासल्यास जेव्हा हा शेतकरी पैसे घेण्यासाठी गेला असता नोटांची अवस्था पाहून त्याला धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोईम्बतूर जिल्ह्यातील वेलिंगाडू गावात रंगराज नावाचा शेतकरी राहतो. त्याने आपल्या शेतात पिकवलेले धान्य विकून 50 हजार रुपये जमा केले होते. हे सर्व पैसे रंगराज यांनी आपल्या झोपडीतील एका पिशवीत ठेवले होते. कामासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी पिशवी उघडली त्यावेळी शेतमाल विकून मिळालेल्या सर्व नोटा कुरतडल्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. उंदारांनी पिशवीत ठेवलेले 50 हजार रुपये कुरतडले होते. रंगराज यांच्याकडे 500 आणि 2000 च्या नोटा होत्या.
उंदरांनी कुरडलेल्या नोटा बदलून मिळाव्यात यासाठी रंगराज कुरतडलेल्या नोटा घेऊन बँकेत गेले. मात्र तिथे त्यांची निराशा झाली कारण बँकेने या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. बँकेतील अधिकाऱ्यांनी कुरतडलेल्या नोटा बदलून मिळू शकणार नाही असे त्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. नोटा कुरतडल्यामुळे कुटुंबीय आर्थिक संकटात असल्याचं रंगराज यांनी म्हटलं आहे. उंदराने आपल्या 50 हजार रुपयांच्या नोटा कुरतडल्यामुळे आपल्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असल्याचे रंगराज यांनी सांगितले.
आसाममधील तिनसुकियाच्या लाईपुलीमधील एका एसबीआयच्या एटीएममध्ये उंदरांनी धुडगूस घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या एटीएममधील तब्बल 12 लाख 38 हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या पैशांविरोधात लढाईचा भाग म्हणून हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. 'यापुढे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कागज का तुकडा होतील,' असं त्यावेळी मोदींनी म्हटलं होतं. आता आसाममधील उंदरांनी नोटा कुरतडून त्यांना शब्दश: 'कागज का तुकडा' केलं आहे. एसबीआयचं एटीएम तांत्रिक कारणांमुळे 20 मेपासून बंद होतं. याबद्दलची माहिती मिळताच कर्मचारी दुरुस्तीसाठी एटीएममध्ये आले आणि तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. याठिकाणी पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांचे तुकडे त्यांना दिसले. 19 मे रोजी खासगी सुरक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएममध्ये 29.48 लाख रुपये भरले होते. यानंतर पुढच्याच दिवशी एटीएममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. यानंतर एटीएम बंद करण्यात आलं.