नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रानुसार, रतुल पुरीने अमेरिकेतील नाइटक्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख डॉलर म्हणजेच 7.8 कोटी रुपये उडविले आहेत. याशिवाय, रतुल पुरीचे सहकारी आणि मोजरबेअर इंडिया कंपनीचे नाव सुद्धा या आरोपपत्रात आहे.
एका रात्रीत क्लबमध्ये उडविले 7.8 कोटी रुपये...अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्रात म्हटले आहे की, 'देवाण-घेवाण व्यवहारांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानुसार समजले की भारत आणि विदेशातील अनेक महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी ट्रान्जक्शन झाले आहे. प्रोव्होकेटर नाव असलेल्या नाइट क्लबमध्ये एका रात्रीत 11 लाख 43 हजार 980 डॉलर (जवळपास 7.8 कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत.' तसेच, अंमलबजावणी संचालनालयाने दावा केला आहे की, नोव्हेंबर 2011 आणि ऑक्टोबर 2016 दरम्यान रतुल पुरीने आपल्या आलिशान जीवनशैलीसाठी 45 लाख डॉलर खर्च केले आहेत.
मनी लॉन्ड्रिंगसाठी तयार केल्या बनावट कंपन्याआरोपपत्रात म्हटले आहे की, रतुल पुरीने जवळपास 8 हजार कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केली आहे. मोजरबेअर इंडिया कंपनीने बँकांकडून मिळणारे कर्ज आपल्या सब्सिडीयरीज कंपन्यांमध्ये ट्रान्सफर केले. मनी लॉन्ड्रिंगसाठी बनावट कंपन्या तयार केल्या. कर्ज ट्रान्सफर करण्यात आलेल्या बाराहून अधिक सब्सिडियरीज कंपन्यांच्या नावांचा उल्लेख या आरोप पत्रात करण्यात आला आहे.
110 पानांचे आरोपपत्र दाखलअंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी दिल्ली न्यायालयात 110 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांपासून मोजरबेअर इंडिया कंपनीने आपल्या सब्सिडियरी आणि असोसिएट कंपन्यांमध्ये 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
20 ऑगस्टला अटक3,600 कोटी रुपयांच्या अगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात सुद्धा रतुल पुरी आरोपी आहे. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 20 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो अटकेत आहे.