नवी दिल्ली - दिल्लीतील हिसेंवरून राजकीय वादंग माजले आहे. भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. सत्ताधारी भाजपाचे काही नेतेच दिल्लीतील हिंसाचारास जबाबदार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. तर, काही भाजपा नेत्यांकडून विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलं जात आहे. दिल्लीतील घटनेनं देश हादरला आहे. त्यातच, भाजपा नेते आणि अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करुन भाष्य केलं आहे.
अनुपम खेर यांनी एक ट्विट केलं असून त्यांच्या या ट्विटला अभिनेता परेश रावल यांनी रिट्विट करत समर्थन केलंय. ''कमाल है न.... बेइमानी से पैसा कमाने वाले भी, ईमानदार चौकीदार ढूंढते हैं... :)'' असे ट्विट अनुपम खेर यांनी केलं होतं. अनुपम यांच्या ट्विटला रिट्विट करत अभिनेता परेश रावल यांनी त्यांच समर्थन केलंय. तसेच, हमारे देश के कुछ बेईमानदार लोगों को इमानदार चौकीदार पसंद नही है... असेही रावल यांनी म्हटलं आहे. रावल यांनी आपल्या ट्विटमधून मोदींचं कौतुक केल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 42 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 123 एफआयआर दाखल केल्या असून 630 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी हिंसेची चौकशी करण्यासाठी दोन एसआयटी टीमही स्थापन केल्या आहेत.दिल्लीतील हिंसेबाबत अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मत व्यक्त केलंय. काही राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचे नेते हिंसेतील पीडितांच्या जखमांवर मीठ चोळत असून हिंसा पुन्हा भडकविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, राजधानीत पुन्हा शांतता स्थापन होईल, असा विश्वास अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी व्यक्त केला आहे.