Yogi Adityanath on Sanatan row: तामिळनाडुचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यातच आता, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सनातनवर बोट दाखवणाऱ्यांवर कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रिझर्व्ह पोलिस लाइनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
त्यांना लाज वाटली पाहिजे...सीएम योगी म्हणाले, आज आपला देश सकारात्मक दिशेने आण समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पण, भारताची ही बदलती जागतिक प्रतिमा काही लोकांना आवडत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून सनातन धर्माचा अपमान केला जातोय. ज्या सनातन धर्माचा रावणाच्या अहंकाराने नाश झाला नाही, जो सनातन कंसाच्या गर्जनेनेही हादरला नाही, जो सनातन बाबर आणि औरंगजेबाच्या जुलमी अत्याचाराने नष्ट झाला नाही, तो सनातन या तुच्छ लोकांमुळे काय नष्ट होणार? त्यांना स्वतःच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.
श्रीकृष्णाचा जन्म धर्म स्थापनेसाठी झालामुख्यमंत्री पुढे म्हणाले, भगवान श्रीकृष्णाचा जन्म धर्म स्थापनेसाठी झाला. जेव्हा जेव्हा भारतात अराजकता पसरली, तेव्हा आपल्या दैवी अवतारांनी समाजाला मार्गदर्शन केले. कर्मण्येवाधिकारस्तेची प्रेरणा समाजाला प्रोत्साहित करत आली आहे. मानवतेचा धर्म सनातन धर्म आहे. यावर बोट उचलणे म्हणजे माणुसकी धोक्यात आणण्याचा एक दुर्धर प्रयत्न आहे. कोणताही सनातन धर्मावलंबी कधीही म्हणत नाही की, आम्ही विशेष आहोत आणि बाकी तुच्छ आहेत. कोणी सूर्यावर थुंकण्याच्या प्रयत्न केला, तर त्याच्याच चेहऱ्यावर पडणार. अशा कृत्यामुळे त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना लाज वाजेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
सनातन धर्म हे शाश्वत सत्य आहेभारताला जगातील सर्वात मोठी शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण, ज्यांना भारताची प्रगती आवडत नाही, ते असेच प्रयत्न करत राहतील. रावण, कंस आणि हिरण्यकशिपू यांनी एकेकाळी सनातन धर्म आणि देव यांना आव्हान दिले होते, आज ते नाहीसे झाले आहेत. सनातन धर्म हे शाश्वत सत्य आहे, अशी प्रतिक्रियाही योगींनी यावेळी दिली.