दस-याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे दहन केले जाते. समाजातील वाईट गोष्टींचे प्रतीक म्हणून रावणाकडे पाहिले जाते. सीतेचे अपहरण करून तिला लंकेला नेणारा राक्षस म्हणून रावणाचे वर्णन केले जाते. त्यामुळे दसºयाच्या दिवशी रावणाचे विविध आकारांचे पुतळे तयार करून, त्यांचे दहन ठिकठिकाणी केले जाते.दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वत्र रावण दहन पाहायला प्रचंड गर्दी होते. दिल्लीत तर राजकारणीही त्यात सहभागी होतात. रावणाचा अवाढव्य पुतळा सहजपणे अनेकदा जळत नाही. त्यामुळे त्याच्या आत फटाके भरण्याचीही पद्धत आहे. या फटाक्यांचा स्फोट होऊ न पुतळा सहज जळू शकतो हे खरेच, पण त्याबरोबर फटाक्यांच्या स्फोटांमुळे दरवर्षी तिथे असलेल्यांपैकी काहींना इजाही होते.पण अशा राक्षस समजल्या जाणाºया रावणाची भारतात मंदिरे आहेत; आणि राजस्थानातील मंदोदर शहरातील लोक तर त्याला जावई मानतात. रावणाचा विवाह मंदोदरीशी झाला होता आणि ती राजस्थानातील होती, असा समज आहे. जोधपूरपासून १0 किलोमीटरवर मंदोदर गाव आहे आणि तिथे रावणाचे मोठे मंदिर आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये व बिसरखमध्ये, मध्य प्रदेशातील विदिशा शहरात व मंदसौरमध्ये, आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे रावणाचे मंदिर आहे. श्रीलंकेमध्येही रावणाची असंख्य मंदिरे आहेत. तेथील जनतेला तो राक्षस वा दानव वाटतच नाही.तामिळनाडूमध्येही रावणाला राक्षस मानले जात नाही. किंबहुना तो द्राविडी संस्कृतीचा प्रतीक म्हणून ओळखला जातो. आर्यांनी द्राविडी संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विरोध करणारा रावण हाच होता, अशी तेथील लोकांची धारण आहे. तामिळनाडूमध्ये द्राविडी संस्कृती जपण्याचा कायम प्रयत्न होत आला आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राजकीय नेत्यांना त्यांनी कधीही जवळ केले नाही.
रावणाचे दहन करतात आणि मंदिरांमध्ये पूजाअर्चाही केली जाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:39 AM