मुंबई - शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला माल रस्त्यावर टाकून सरकारच्या धोरणाचा तिव्र विरोध केलाय. पण अभिनेत्री रवीना टंडनला शेतकऱ्यांची आंदोलन करण्याची ही पद्धत रुचली नाही. आंदोलन करणाऱ्याला रवीनाने आपल्या शब्दात खडासावले. आंदोलक शेतकऱ्यांना तुरुंगात टाका, जामीनही देऊ नका असे ट्विट केल्यानंतर तिच्यावर काही नेटिझन्सनी टीका केली होती. काही काळानंतर रवीनाने आपले ट्विट डिलीट केले आहे.
रवीनाने आपल्या ट्विटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाले असल्याचे स्पष्टीकरण रवीना टंडनने दिले आहे. मी नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असते, त्यांच्या सर्व समस्या, अडचणी सुटाव्यात, अशी प्रार्थना करत असते. मी केवळ अंदोलनकर्त्यांनी अन्न फेकून देऊ नये, गरिबांना वाटावे, अशी विनंती केली होती, माझ्या ट्टिवचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असेही रवीना म्हणाली आहे.
काय केले होते रवीनाने ट्विट - किती दुर्दैवी घटना घडत आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये. असे ट्विट रवीनाने केले होते.