ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - सोमवारी (दि.5) सकाळी सीबीआयने एनडीटीव्हीचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रणय रॉय यांच्या घरी छापेमारी केली. यानंतर मोदी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियासह अनेक राजकिय पक्षांपासून विविध सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सरकारवर टीका करण्यात येत आहे.
प्रणय रॉय यांच्यावर निधीमध्ये फेरफार आणि बँकेचं नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने गुन्हाही दाखल केला आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, दिल्ली आणि देहाराडूनमध्ये छापा टाकण्यात आला आहे. प्रणय रॉय यांच्यावर आयसीआयसीआय बँकेचं 48 कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप आहे.
या दरम्यान एनडीटीव्हीचे पत्रकार रविश कुमार यांनी आपल्या रोखठोक शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट पंतप्रधानांना आमने-सामने येण्याचं खुलं आव्हान दिलं आहे. ""संपवण्याची इतकीच हौस असेल तर कधी समोरासमोर खुर्चीवर बसा मग होऊन जाऊद्या"" असं मोदींचं नाव न घेता रविश यांनी खुलं आव्हान दिलं आहे. फेसबुकवर एक पोस्ट करून रविश यांनी हे आव्हान दिलं आहे. पोस्टमध्ये त्यांनी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख थेट पंतप्रदान आणि केंद्र सरकारकडे असल्याचं समजतं. या पोस्टमध्ये त्यांनी मीडियावरही टीका केली आहे. सर्व मीडिया केंद्र सरकारच्या इशा-यावर काम करते असं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.
रविश कुमार यांच्या आव्हानानंतर सोशल मीडियावरून मोदींनी आव्हान स्वीकारण्याचा सूर पाहायला मिळत आहे. तर काहींनी मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पत्रकार करण थापर यांना दिलेल्या इंटरव्ह्यूची आठवण करून देत हे आव्हान मोदी स्वीकारणार नाहीत असं म्हटलं आहे.
रविश कुमार यांनी दिलेलं आव्हान पंतप्रधान मोदी स्वीकारणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
काय आहे रविश कुमार यांची फेसबुक पोस्ट-
"तो आप डराइये, धमकाइये, आयकर विभाग से लेकर सबको लगा दीजिये। ये लीजिये हम डर से थर थर काँप रहे हैं। सोशल मीडिया और चंपुओं को लगाकर बदनामी चालू कर दीजिये लेकिन इसी वक्त में जब सब "गोदी मीडिया" बने हुए हैं , एक ऐसा भी है जो गोद में नहीं खेल रहा है। आपकी यही कामयाबी होगी कि लोग गीत गाया करेंगे- गोदी में खेलती हैं इंडिया की हज़ारों मीडिया। एन डी टी वी इतनी आसानी से नहीं बना है, ये वो भी जानते हैं। मिटाने की इतनी ही खुशी हैं तो हुज़ूर किसी दिन कुर्सी पर आमने सामने हो जाइयेगा। हम होंगे, आप होंगे और कैमरा लाइव होगा।"