नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारत बंदची घोषणा केली होती. या भारत बंदला राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दर्शविला. यावर, राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
"काही प्रतिष्ठित लोक आज शेतीसंबंधीच्या कायद्याचा निषेध करत आहेत. फक्त कायद्यांना विरोध करायचा म्हणूनच ते विरोध करत आहे. त्यांची याबाबत कोणतीही ठोस भूमिका नाही. या कायद्यात सुचवलेल्या सुधारणांची गरज या लोकांनी आधीच ओळखली आहे. तरीदेखील मुद्दाम विरोध केला जात आहे. मात्र आम्ही हे शेती कायदे शेतीसाठी कसे लाभदायक आहेत याबद्दल लोकांना आणि शेतकऱ्यांना समजावून देऊ" असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
तीन कृषी कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्या आणि एमएसपी कायमच राहतील. तिन्ही कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी चुकीची आहे, असे म्हणत मोदी सरकारमध्ये शेतकरी आनंदी होत आहेत, असा दावा रविशंकर प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी केला आहे. तसेच, शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. शेतकर्यांचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी सरकार समर्पित आहे. बाजारपेठ शेतकर्यांसाठी संपणार नाही किंवा एमएसपीही संपणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कुणी ताब्यात घेणार नाहीत. हे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर"
"देशातील शेतकरी वर्ग रास्त मागण्यांसाठी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दाबण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. ज्यांच्यामध्ये नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा DNA आहे, त्याच लोकांना या शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी आणि देशद्रोही दिसतात" असं समाजवादी पार्टीच्या सुनील सिंह साजन यांनी म्हटलं आहे.
"अखिलेश यादव यांनी ठरवलं आहे की शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गावोगावी फिरून कायद्याविरोधात निषेध नोंदवायचा आहे. आमंच्या विरोधात कितीही खटले दाखल करण्यात आले तरीही आम्ही थांबणार नाही. आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं किंवा आंदोलन दडपण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करण्यात आला तरी आम्ही एकही पाऊल मागे हटणार नाही. शेवटपर्यंत समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील" असं देखील साजन यांनी म्हटलं आहे.