मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावणारे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा फेटाळताना प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियानं प्रसाद यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याचे पडसाद ट्विटरवर लगेचच पाहालया मिळाले. या सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय, असं ट्विट एका वापरकर्त्यानं केलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं उद्या हे सरकार चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यालाही रोजगार म्हणेल, असा टोला लगावला आहे.