श्रीमंत माने
लखनऊ : लौकिकार्थाने ते बाहुबली नाहीत. त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्काही नाही. तरीदेखील तब्बल २५१ वेळा तुरूंगात जाण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लखनऊ सेंट्रल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार, अखिलेश यादव मंत्रिमंडळातील माजी कॅबिनेटमंत्री रविदास मेहरोत्रा हे या अवलियाचे नाव.
६६ वर्षांचे मेहरोत्रा तिसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश करण्यासाठी नशीब आजमावत आहेत. गेल्यावेळी त्यांना पराभूत करणारे भाजपचे ब्रजेश पाठक आता अन्य मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे मेहरोत्रा यांचा विजय सोपा असल्याचे दिसते. या मतदारसंघात सर्वत्र त्यांची प्रतिमा लढवय्या, चळवळ्या नेता अशी आहे. अनोख्या विक्रमाबद्दल विचारले तर ते नुसतेच हसतात. यामुळेच मेहरोत्रा राजधानीत चर्चेचा मुद्दा बनले आहेत.
मदतीसाठी तत्पर छोटे दुकानदार, फेरीवाले, रिक्षावाले असोत की अगदी महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटना असोत. न्याय मागण्यासाठी कुणी रस्त्यावर उतरलेले असेल, तर त्यांच्या मदतीला हमखास धावून जाणारा रविदास मेहरोत्रा नावाचा कार्यकर्ता नंतर १९८९ मध्ये दीड वर्षांसाठी व नंतर २०१२ मध्ये पुन्हा आमदार बनला, मंत्री झाला तरी सामान्यांच्या प्रश्नांवरील आंदोलने हा अजूनही त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. इतके गुन्हे, इतक्या वेळा तुरूंगवास यातून कधीकधी गमतीजमती घडतात. प्रत्यक्ष अपराधी नसतानाही या गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळण्यात अडचणी आल्या.