ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - एअर इंडियाच्या विमान कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी अखेर उठवण्यात आली आहे. खासगी क्षेत्रातील चार आघाडीच्या विमान कंपन्यांचा समावेश असलेल्या दी फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने लोकसभा सदस्यांवरील विमान प्रवास बंदी उठवल्यानंतर आता जेट एअरवेज, स्पाइसजेट, गो एअर आणि इंडिगो यांनीही ही बंदी उठवली आहे.
रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवास बंदी उठवण्यात यावी असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांना दिले होते. त्यानंतर गायकवाड यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. गायकवाड यांच्याप्रमाणेच इंडिगोच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालणारे टीडीपीचे खासदार दिवाकर रेड्डी यांच्यावर घालण्यात आलेली बंदीसुद्धा उठवण्यात आली आहे. अधिक वाचा(मी तो नव्हेच ! रवींद्र गायकवाड वापरत आहेत "डुप्लिकेट" )( रवींद्र गायकवाड प्रकरणी संसदेतही राडा, सभागृह तहकूब )( रवींद्र गायकवाडांचा 7 दिवसांत 7 वेळा हवाई प्रवासाचा प्रयत्न अयशस्वी )
24 मार्च 2017 रोजी शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्याचे संतप्त पडसाद उमटले होते. त्यानंतर त्यांच्यावर एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच गायकवाड यांना एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईस जेट या विमान कंपन्यांनी नो फ्लाय यादीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला टाटा समूहातील कंपन्यांनीही पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे व्हिसारा आणि एअर एशियाच्या विमानांमध्येही रविंद्र गायकवाडांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रवींद्र गायकवाड यांच्यावरून संसदेतही गदारोळ झाला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले होते. त्यावेळी रविंद्र गायकवाडांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना मी एअर इंडियाच्या कर्मचा-यावर पहिला हात उचलला नाही. एअर इंडियाच्या कर्मचा-याने माझी कॉलर पकडून मला ढकलले त्यावेळी मी प्रतिकार केला, असे ते म्हणाले होते.