ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - एअर इंडियाच्या कर्मचा-याला चपलेने मारहाण करणारे उस्मानाबादचे शिवसेना खासदार रविंद्र गायकवाडांना विमान कंपन्यांनी चांगलेच ताळयावर आणले आहे. विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरु आहेत त्यावरुन ते हवाई प्रवासासाठी हतबल झाल्याचे दिसत आहे.
मागच्या सात दिवसात सातवेळा त्यांचा हवाई प्रवासाचा प्रयत्न अयशस्वी ठरला. कधी नाव बदलून तर, कधी अन्य मार्गांनी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न एअर इंडियाने यशस्वी होऊ दिला नाही. मंगळवारपासून त्यांनी पाचवेळा विमानाने दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला. मागच्या शुक्रवारी दिल्ली ते पुणे प्रवासाची त्यांनी दोन तिकीटे बुक केली होती.
एकदा एअर इंडियाने आणि एकदा इंडिगोने त्यांचे तिकीट रद्द केले. आमच्या कुठल्याही विमानात रविंद्र गायकवाडांना प्रवेश न देण्याचे आम्हाला आदेश आहेत असे एअर इंडियाच्या अधिका-याने सांगितले. शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन गायकवाडांच्या हवाई प्रवासावरील बंदी उठवण्याची मागणी केली.