नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भाजपाने जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकिट दिले आहे. तीन वर्षांपूर्वी रिवाबा जडेजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.
मागील आठवड्यातील मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीनंतर आता भाजपाने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे. गुजरात भाजपाचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनाही तिकीट देण्यात आले आहे. या जागेचे विद्यमान आमदार भाजपचे धर्मेंद्रसिंह जडेजा आहेत, मात्र पक्षाने रिवाबा यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
जडेजाने पत्नीला दिल्या शुभेच्छा पत्नीला विधानसभेचे तिकिट मिळताच रवींद्र जडेजाने एक ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. "विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे तिकीट मिळाल्याबद्दल माझ्या पत्नीचे अभिनंदन. तु केलेल्या सर्व प्रयत्नांचा आणि परिश्रमाचा अभिमान वाटतो. समाजाच्या विकासासाठी तु असेच काम करत राहा याच माझ्या तुला शुभेच्छा. मी आमचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि श्री अमित शाहजी यांचेही आभार मानू इच्छितो त्यांनी माझ्या पत्नीच्या क्षमतेवर विश्वास ठेवत उत्तम काम करण्याची संधी दिली." अशा शब्दांत जडेजाने मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांचे देखील आभार मानले आहेत.
१ आणि ५ डिसेंबरला होणार निवडणुका गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. केंद्रीय निवडणूक समितीने गुजरात निवडणुकीसाठी पक्षाच्या १८२ उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपा अध्यक्ष सीआर पाटील, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"