मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (1 डिसेंबर, गुरुवार) मतदान होत आहे. एकूण 182 पैकी 89 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, क्रिकेटर रवींद्र जडेजाने मतदानापूर्वी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह 'एका वाघाचे बोलणे ऐका, अजून वेळ आहे, गुजरातींनो समजून घ्या!' असे कॅप्शन जडेजाने व्हिडिओसोबत दिले.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा उत्तर जामनगरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रवींद्र जडेजाने रिवाबाला म्हणजेच भाजपला मतदान देण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणातात की, 'जर नरेंद्र मोदी गेले, तर गुजरात गेले समजा.' बाळासाहेब ठाकरे कधी आणि कोणत्या पार्श्वभूमीवर हे बोलले होते, याची अनेकांना उत्सुकता आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली होती.
पहा बाळासाहेबांचा व्हिडिओ...
आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे कधी आणि का बोलले? उद्धव ठाकरे यांनी यावर्षी मे महिन्यात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली होती. गुजरातमध्ये गोध्रा घटना घडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे बोलले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गुजरात जळत होता, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते.
त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपची मित्रपक्ष होती. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी सर्व बाजूंनी दबाव निर्माण केला जात होता. वाजपेयी यांनी मोदींना हटवण्याचा निर्णय घेतला होता. मित्रपक्ष म्हणून अडवाणींनी बाळासाहेबांना त्यांचे मत विचारले होते. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे लालकृष्ण अडवाणींना म्हणाले होते, 'नरेंद्र मोदी गेला तर गुजरात जाईल...'