लोकमत न्यूज नेटवर्क, जामनगर : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचा गुरुवारी गुजरातच्या जामनगरमध्ये भर कार्यक्रमातच महापौर आणि खासदाराशी (दोन्ही भाजप नेते) जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जामनगर (उत्तर)च्या आमदार रिवाबा ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, ज्यात नेत्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी श्रद्धांजलीसाठी चप्पल काढल्यावर महिला सहकाऱ्यांनी ‘ओव्हर स्मार्ट’ म्हणून टोमणे मारल्याचा आरोप रिवाबा यांनी केला. टोमणे मारताना ऐकल्याचे म्हणत रिवाबा यांचा खासदार पूनमबेन मदान यांच्याशी भर कार्यक्रमातच वाद सुरू झाला. त्यानंतर रिवाबा यांनी महापौर बिनाबेन कोठारी यांच्याशी वाद घालत नम्रपणे बोलण्यास सांगितले. यावेळी ‘औकातीत राहा’ असेही रिवाबा यांनी सुनावले.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही अशा कार्यक्रमात चप्पल काढत नाहीत; पण काही अडाणी लोक अतिशहाणे बनतात असे खासदार पूनमबेन म्हणाल्या. मला ते आवडले नाही म्हणून मी बोलले, चप्पल काढून मी काही चूक केली का,’ असा सवाल रिवाबा यांनी विचारला आहे.