एनडीटीव्हीमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरूच आहे. प्रणय रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांनी एका दिवसापूर्वीच मीडिया हाऊसचा निरोप घेतला होता. हिंदी वाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांनीही बुधवारी संध्याकाळी आपला राजीनामा दिला. रवीश कुमार चॅनलचे फ्लॅगशिप शो हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राइम टाइमसह अनेक कार्यक्रम होस्ट करत असत.
रवीश कुमार यांच्या राजीनाम्याची घोषणा करताना, चॅनलने एक अंतर्गत मेल पाठवला की त्यांचा राजीनामा तात्काळ रुपाने प्रभावी आहे. म्हणजेच आता रवीश कुमार एनडीटीव्हीसाठी शो करताना दिसणार नाहीत. रवीश कुमार यांना त्यांच्या पत्रकारितेसाठी दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार आणि २०१९ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
“असे काही मोजकेच पत्रकार आहेत ज्यांनी रविश यांच्याइतका लोकांवर प्रभाव सोडला आहे, हे त्यांच्याबाबत उमटणाऱ्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे,” असं एनडीटीव्ही समुहाच्या प्रेसिडेंट सुपर्णा सिंग म्हणाल्या. एनडीटीव्हीमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बीएसईकडे केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच कंपनीच्या संचालक मंडळावर तीन नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अदानी ग्रुपचे सीईओ सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल सिन्नैया चेंगलवरायन यांचा समावेश आहे.