नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्यावर अनेक आरोप केले. राहुल गांधींनी परदेशात भारताचा अपमान केला, त्यासाठी त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही, तर भाजप त्यांच्या विरोधात देशव्यापी मोहीम राबवेल,' असे रविशंकर म्हणाले.
पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, 6 मार्चपासून राहुल गांधी परदेशात होते. आता ते अचानक प्रकट झाले आणि खोटं बोलू लागले. राहुल किती दिवस देशाची दिशाभूल करणार आहेत. भारतीय जनता आणि परदेशात लोकशाहीचा अपमान करणे ही राहुल यांची सवय झाली आहे. राहुल गांधी तुम्ही याच लोकशाहीत वायनाड आणि हिमाचलमध्ये जिंकलात, असेही ते म्हणाले.
'विधानावर खेद व्यक्त केला नाही'भाजप नेते पुढे म्हणाले की, आजही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केलेला नाही. राहुल गांधी इंग्लंडमध्ये जे बोलले, त्यावर आज चकारही काढला नाही. राहुल गांधी तुमचा अहंकार देशापेक्षा मोठा नाही. राहुल यांनी माफी मागावी, अशी भाजपची मागणी आहे. त्यांच्या माफीसाठी भाजप मोहीम राबवणार आहे, असंही ते म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी?आज दुपारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना, भाजपने माफी मागावी, अशी मागणी करत राहुल गांधींनी पुन्हा अदानीचा मुद्दा उपस्थित केला. सरकार अदानी प्रकरणाला घाबरले आहे. मला संसदेत बोलायचे आहे, सरकारच्या चार मंत्र्यांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मला बोलू द्यावे. पण, मला बोलू दिले जाईल असे वाटत नाही, अशी टीका राहुल यांनी केली होती.