देहरादून : उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोमवारी नैनीतालच्या उच्च न्यायालयात आव्हान दिले.न्या. यु.सी. ध्यानी यांच्या एकलपीठाने याप्रकरणी आज मंगळवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले. रावत यांच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल करताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आक्षेप घेतला. मंगळवारच्या सुनावणीच्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता केंद्र सरकारची बाजू मांडतील. सोमवारी राकेश थपियाल यांनी केंद्राकडून युक्तिवाद केला. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कलम ३५६ चा वापर करण्यायोग्य परिस्थिती नाही, असे सिंघवी यांनी न्यायालयाला सांगितले. राष्ट्रपती राजवट ही लोकशाहीची हत्या असून शांतता मिरवणुका काढत निषेध नोंदविला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय म्हणाले.(वृत्तसंस्था)
राष्ट्रपती राजवटीविरुद्ध रावत उच्च न्यायालयात
By admin | Published: March 29, 2016 2:42 AM