नवी दिल्ली : भारताच्या हद्दीत चिनी लष्कराने घुसखोरी केल्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तसेच लष्करी पातळीवरही चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून कोणताही तोडगा निघत नसल्यास हा प्रश्न सोडविण्यासाठी भारताकडे लष्करी पर्याय उपलब्ध आहेत, असा सूचक इशारा चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे.
पूर्व लडाखमधील गलवान खोºयामध्ये एप्रिल-मेपासून चीनच्या लष्कराने घुसखोरी केली असून, तो प्रश्न आता चिघळत चालला आहे. चीनच्या सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. या दोन देशांतील तणावही वाढला आहे. गलवान खोरे, कोंग्रूंग नाला, हॉट स्प्रिंग्स या भारतीय भागांमध्ये चीनने घुसखोरी केली होती. तेथील फिंगर भागातून चिनी लष्कर मागे हटण्याऐवजी तो देश भारतालाच वेगवेगळे पर्याय देत असून त्याद्वारे वेळकाढूपणा करीत आहे.बिपीन रावत म्हणाले की, लडाखमधील घुसखोरीबद्दल दोन्ही देशांत सुरू असलेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्यास भारताकडे लष्करी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, ते पर्याय नेमके कोणते, याबाबत अधिक माहिती सांगण्यास रावत यांनी नकार दिला.चीनचा शेजारी देशांना त्रासचीनने विस्तारवादी भूमिकेतून शेजारील राष्ट्रांचे भूभाग गिळंकृत केले आहेत. नेपाळमधील सीमावर्ती सात जिल्ह्यांतील काही भूभागावरही चीनने आक्रमण केले आहे. भारताशी अरुणाचल प्रदेशवरून सातत्याने वाद घालणाºया चीनने आता पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केली.चीनचे जपान व इतर काही देशांबरोबरही वाद सुरू आहेत. या विस्तारवादी भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेल्या चीनबद्दल कोरोना साथीनंतर जगभरात घृणा निर्माण झाली आहे. चीनमधील वुहान शहरातून कोरोनाची साथ पसरली व तिने अमेरिकेसह अनेक देशांचे प्रचंड नुकसान केले आहे. कोरोनाचा विषाणू चीनने प्रयोगशाळेत तयार केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. या दोन देशांत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.