ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - नोटाबंदीमुळे त्रस्त झालेल्या कर्जधारकांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. एक कोटी रुपयापर्यंतच्या कर्जांचा हप्ता भरण्यासाठी कर्जदारांना अजून 30 दिवसांची मुदत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. आयाधी 21 नोव्हेंबरला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 60 दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे कर्जाचा हप्ता भरण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीच्या मुदतीचा कालावधी आता 90 दिवस झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने एक पत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे. कर्जाच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यांसाठी या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात व्यापक प्रमाणावर चलन तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण असून, कर्जधारकांनाही कर्जाचे हप्ते भरणे अवघड झाले आहे.