RBI Governor Shaktikanta Das Latest News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'सध्या जागतिक अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे, पण भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहे,' असे वक्तव्य दास यांनी केले आहे. ते बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक परिषदेत बोलत होते.
'भारतीय रुपया चांगल्या स्थितीत 'शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध हे जागतिक मंदीचे मुख्य कारण आहे. या दोन घटकांचा नकारात्मक परिणाम जवळपास सर्वच देशांवर दिसून आला आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही. जगभरात चलनाच्या किमतींवरुन गोंधळाचे वातावरण आहे. पण, तुम्ही अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना केली, तर तुम्हाला भारतीय रुपया अजूनही चांगल्या स्थितीत दिसेल,' असेही ते म्हणाले.
'महागाईसाठी योग्य निर्णय घेतले जातील'दास पुढे म्हणतात की, 'युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि महामारीमुळे जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक दृष्टीकोन अनिश्चित झाला आहे. देशांना उच्च महागाई, अन्नधान्याची कमतरता, मागणी आणि पुरवठेतील बिघडलेला ताळमेळ, यांचा सामना करावा लागत आहे. चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी 2016 मध्ये स्वीकारलेल्या सध्याच्या धोरणाने चांगले परिणाम दिले आहेत. गेल्या वर्षांतील चलनवाढीची पातळी आरबीआयच्या लक्ष्याशी सुसंगत होती,' असेही दास म्हणाले.