ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहार आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्यावर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आज रिझर्व्ह बँकेकडून दिलासा मिळू शकतो. रिझर्व्ह बँक आज रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्याची शक्यता आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.
याआधी 1 जानेवारीला एटीएममधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा दररोज अडीच हजार रुपयांवरून चार हजार पाचशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र त्यावेळी बँकेतून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याच्या मर्यादेत वाढ करण्यात आली नव्हती. मात्र आता रिझर्व्ह बँक या मर्यादेत वाढ करण्याची शक्यता आहे.
8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यावर दोन हजार 500 रुपयांची तर, बँकेतून पैसे काढण्यावर दहा हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. दरम्यान पुढे ही मर्याया वाढवून आठवड्याला 24 हजार रुपये इतकी करण्यात आली होती. मात्र नोटाबंदीनंतर निर्माण झालेली रोख टंचाईची परिस्थिती बऱ्यापैकी निवळली आहे. मात्र रोख रक्कम काढण्याची मर्यादा कधी वाढवण्यात येणार त्याची वाट सर्वसामान्य पाहत आहेत.