ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.२ - अपेक्षेप्रमाणेच रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कोणताही बदल न करता दर 'जैसे थे'च ठेवले आहेत. चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण जाहीर करताना आरबीआयने रेपो रेट ६.७५ टक्के ( रिझर्व्ह बँक इतर बँकाना ज्या व्याजदराने पैसे देते) व रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाई आणि आर्थिक घडी बसवण्यासाठी आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केले नाहीत. तज्ज्ञांच्या मतानुसार अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच रिझर्व्ह बँकेकडून याबाबत निर्णय होऊ शकतो.
आरबीयाच्या या निर्णयामुळे रेपो रेट ६.७५ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के तर सीआरआर ४ टक्के इतका कायम आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे व्याजदर कपातीकडे डोळे लावून बसलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. दरम्यान या महिना अखेरीस सादर होणारा अर्थसंकल्प बँकांसाठी सकारात्मक असेल तर मार्च वा एप्रिलमध्ये व्याजदरात ०.२५ टक्के कपात होऊ शकते.
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व बँक इतर बँकांना ज्या दराने कर्जाऊ पैसे देते, त्याला रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट वाढल्यास बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते आणि पर्यायाने तर इतर बँकांनाही ग्राहकांना देणा-या कर्जावरील व्याजदर वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
इतर बँका आरबीआयकडून कर्ज घेतात, त्याप्रमाणे रिझर्व बँकही या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. त्यासाठी त्यासाठी जो व्याजदर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात.