नवी दिल्ली -भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आरबीआयने रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचे बलदल केलेले नाहीत. या शिवाय रिझर्व्ह रेपो रेटमध्येही कसल्याही प्रकारचे बलद करण्यात आलेले नाहीत. आरबीआयने रेपो रेट 4 टक्क्यांवरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटदेखील 3.35 टक्क्यांवर ठेवण्यात आला आहे. आरबीआयने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कसलाही बदल न केल्याची ही सलग तिसरी वेळ आहे. याशिवाय या वर्षी जीडीपी ग्रोथ -7.5% राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पत धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 2021साठी जीडीपी वाढीचा दर -7.5 टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
दास म्हणाले, ग्रामीण आणि शहरी भागातील मागणीत सुधार झाल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील मागणीमुळे आणखी बळकटी मिळण्याची आशा आहे. तसेच शहरी भागातील मागणीही वाढत आहे. याशिवाय, MSF रेट आणि बँक रेटमध्येही कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. हा रेटही 4.25 टक्क्यांवर जशास तसा ठेवण्यात आला आहे.
शक्तीकांत दास म्हणाले, अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली सुधारणा होताना दिसत आहे. तसेच ही सुधारणा ग्रामीण आणि शहरी, अशा दोन्ही भागांत होताना दिसत आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणा पाहता रिझर्व्ह बँकेने जीडीपीसंदर्भातील आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. रिझर्व बँकेने ऑक्टोबरमध्ये आर्थिक वर्ष 2020-21मध्ये जीडीपी वृद्धि दरात 9.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तवला होता.