नवी दिल्ली : ५ हजार रुपयांहून अधिक रक्कम एकदाच बँकेत जमा करता येईल आणि तसे करताना प्रसंगी खातेदारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, या रिझर्व्ह बँकेने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकामुळे निर्माण झालेला गोंधळ आणि ग्राहकांत उमटलेली संतापाची लाट या पार्श्वभुमीवर ते निर्बंध मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने बुधवारी घेतला. ही केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेची माघार आहे.
आधी केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत लोकांना कितीही रक्कम जुन्या नोटांद्वारे भरता येईल, असे जाहीर केले होते. तसेच अडीच लाखांपर्यंत रक्कम भरल्यास त्याची चौकशी केली जाणार नाही, असेही नमूद केले होते. पण १९ डिसेंबर रोजी ही सवलत काढून घेताना निर्बंध घातल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या होत्या.
सोमवारी काढलेल्या पत्रकात, ज्यांच्याकडे जुने पैसे शिल्लक आहेत त्यांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत एकदाच जमा कराव्यात. आतापर्यंत त्यांनी हे पैसे का जमा केले नाहीत याचा खुलासाही संबंधित व्यक्तीने करावा, असे पत्रक काढले होते. या निर्देशानंतर सरकारला सामान्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, आरबीआयने आज सांगितले की, ज्यांच्या खात्याचे केवायसी आहे त्यांच्यासाठी हे निर्बंध नसतील. ज्यांच्या खात्याचे केवायसी पूर्ण नसेल अशा व्यक्ती ५० हजारांपर्यंतची रक्कम बँकेत भरू शकतील. आता केवायसी असलेला खातेदार जर पाच हजारपेक्षा अधिक जुन्या नोटांची रक्कम भरत असेल तर बँक अधिकारी त्याची विचारणा करणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)