नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना रविवारी संध्याकाळी सीबीआयने कथित मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. तर आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनीही मनीष सिसोदिया यांच्या अटकेला हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, "मनीष सिसोदिया निर्दोष आहेत. त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण आहे. मनीष यांच्या अटकेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लोक सर्व पाहत आहे. लोकांना सर्व काही समजत आहे. लोक याचे उत्तर देतील. यामुळे आमचे मनोबल आणखी वाढेल. आमचा संघर्ष आणखी मजबूत होईल."
दुसरीकडे, संजय सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, "मनीष सिसोदिया यांची अटक म्हणजे हुकूमशाहीचा अंत आहे. मोदीजी, एका चांगल्या व्यक्तीला आणि उत्तम शिक्षणमंत्र्यांना अटक करून तुम्ही चांगले केले नाही, देवसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. एक दिवस तुमची हुकूमशाही नक्कीच संपेल, मोदीजी."
दरम्यान, सीबीआय एफआयआरमधील आरोपी क्रमांक एक असलेल्या मनीष सिसोदिया यांची मागील वर्षी 17 ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात आली होती. एका महिन्यानंतर, 25 नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव नव्हते, कारण त्यावेळी त्यांच्या आणि इतर संशयित आणि आरोपींविरुद्ध सीबीआयचा तपास चालू होता.