नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा आता संसदेच्या सत्रावर लागल्या आहेत. काँग्रेस पक्ष सलग दुसऱ्यांदा विरोधपक्ष नेतेपदापासून दूर राहिला आहे. या व्यतिरिक्त मल्लिकार्जुन खरगे निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे लोकसभेत काँग्रेस नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. तर शशी थरुर यांनी लोकसभेत काँग्रेस नेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तिरुअंतपुरममधून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले थरुर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने आपल्याला लोकसभेत नेता होण्यासाठी सांगितले तर आपण नेतेपदाची जबाबदारी घेण्यास तयार आहोत. यावेळी त्यांनी प्रचारात काँग्रेसकडून झालेल्या चुका सांगितल्या. काँग्रेसची या निवडणुकीतील मुख्य थीम 'न्याय' होती. मात्र न्याय योजनेची माहिती ग्राउंड लेव्हलपर्यंतच पोहोचलीच नसल्याचे थरूर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सॉफ्ट हिंदुत्वावर टीका केली. न्याय योजनेनुसार देशातील गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते.
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे. पक्ष त्यांच्या मदतीसाठी विभागवार कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी विचार करू शकतो, असंही थरूर यांनी सांगितले. थरूर २००९ पासून तिरुअंनतपुरमधून काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत आहेत. २०१४ मध्ये थरूर यांनी भाजपच्या के.ओ. राजगोपाल यांचा पराभव केला होता.
२०१४ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी काँग्रेसला ५२ जागा मिळाल्या आहेत. मात्र गेल्यावेळी प्रमाणे यावेळी देखील काँग्रेसला विरोधीपक्ष नेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ मिळवता आले नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी ५५ जागा जिंकणे आवश्यक असते.